नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचे 92 व्या वर्षी निधन झाले आहे. देशातील राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. आज सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वसनाचा त्रास आणि फुफ्फुसांच्या इन्फेक्शनमुळे त्यांची प्रकृती अधिक गंभीर बनली होती.
डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर एम्स रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने उपचार केले. त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही.
डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबच्या गाह (सध्याच्या पाकिस्तान) येथे झाला. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले होते. ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, योजना आयोगाचे उपाध्यक्ष आणि पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणून काम पाहिले होते.
त्यांनी 1991 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री म्हणून देशाच्या आर्थिक उदारीकरणाची पायाभरणी केली. 2004 ते 2014 या काळात त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला आणि देशाला प्रगतीच्या मार्गावर नेले.
डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षात शोककळा पसरली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. काँग्रेसने उद्या बेळगाव येथे आयोजित सभा रद्द केल्याची माहिती मिळत आहे.
डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे देशाने एक कुशल अर्थतज्ज्ञ आणि शांत, परिपक्व नेते गमावले आहेत. त्यांच्या स्मृतींना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरातील राजकीय नेते आणि नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*