वैजापूर: तालुक्यातील महालगाव येथील पंचगंगा शुगर अॅण्ड पॉवर कारखान्याचा शुभारंभ राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवार, २३ डिसेंबर रोजी होणार आहे. आमदार रमेश बोरनारे यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या साखर कारखान्याच्या स्थापनेमुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.
मागील वर्षी एकनाथ शिंदे यांनी भूमिपूजन केलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात होणार असून, या कार्यक्रमाला गुरूवर्य भास्करगिरीजी महाराज (मठाधिपती, श्री क्षेत्र देवगड संस्थान), रामगिरीजी महाराज (मठाधिपती, गोदाधाम संस्थान) आणि ह.भ.प. स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज (उत्तराधिकारी, श्री क्षेत्र देवगड संस्थान) यांचा शुभआशीर्वाद लाभणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार संदीपान भुमरे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, ओबीसी विकास मंत्री अतुल सावे यांची उपस्थिती असणार आहे. याशिवाय, शेतकऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार रमेश बोरनारे आणि पंचगंगा शुगर अॅण्ड पॉवर कारखान्याचे चेअरमन प्रभाकर शिंदे यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्र्यांचा दौरा:
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी दुपारी १२:३० वाजता मुंबईहून चिकलठाणा विमानतळावर येणार आहेत. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने दुपारी १ वाजता महालगाव येथे कार्यक्रमासाठी पोहोचतील. कार्यक्रमानंतर दुपारी २ वाजता ते परत चिकलठाणा विमानतळावर येऊन मुंबईला रवाना होतील.
ऊस उत्पादकांसाठी महत्त्वाचा प्रकल्प:
पंचगंगा साखर कारखाना सुरू झाल्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला स्थिर भाव मिळण्यास मदत होईल. तसेच, या प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि तालुक्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, या उद्घाटन सोहळ्याचा तालुक्यात मोठा उत्साह आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*