छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा विक्रीला पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. शहरात आजतागायत मांज्यामुळे झालेल्या अनेक जखमांच्या आणि मृत्यूच्या घटनांमुळे हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर कोणी नायलॉन मांजा विकला किंवा विकत घेतला तर त्यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला जाईल.
पोलीस आयुक्तांच्या मते, हा आदेश मोडणाऱ्या विक्रेत्यांवर कलम ११० नुसार सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांतर्गत कारवाई होणार आहे. छत्रपती संभाजीनगर हे राज्यातील पहिलं असं शहर ठरलं आहे, जिथे नायलॉन मांजावर इतक्या कठोरपणे बंदी आणण्यात आली आहे.
महिनाभरात १५ जखमी
शहरात मागील महिन्यात मांज्यामुळे १५ लोक जखमी झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय पक्ष्यांनाही मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कठोर मोहीम सुरू केली आहे.
विक्रेते आणि पालकांवर कारवाई
शहरातील दुकानांमध्ये जर नायलॉन मांजा विक्री होत असल्याचं आढळलं, तर संबंधित विक्रेत्यांवर थेट कारवाई केली जाईल. तसेच, जर अल्पवयीन मुलं नायलॉन मांजा वापरताना आढळली तर त्यांच्या पालकांवरही गुन्हा दाखल होईल.
ऑनलाइन विक्रीवरही कडक नजर
ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून नायलॉन मांज्याचा व्यापार होऊ नये म्हणून ट्रान्सपोर्ट करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल केला जाईल. नाशिकसह छत्रपती संभाजीनगरमध्ये यापूर्वीही मांजावर बंदी होती, मात्र काही ठिकाणी छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याचं आढळलं.
२१० मांजा जप्त, दोघांवर तडीपारी
उंचाळे पोलिसांनी ग्राहक पाठवून नायलॉन मांजा विकणाऱ्या विक्रेत्याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्या जवळून २ लाख रुपयांचे २१० मांजा जप्त करण्यात आले आहेत. संक्रांतीपर्यंत या व्यक्तींवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे नागरिकांनी मांजाचा वापर आणि विक्री टाळावी, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*