छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र कमांडो फोर्समध्ये भरतीचे आमिष दाखवत बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. विशाल मोहन देवळी, विकास बापू माने आणि सनी लाला बागाव अशी आरोपींची नावे असून, हे तिघेही सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरचे रहिवासी आहेत.
बोगस भरतीचे आयोजन
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर 17 डिसेंबर रोजी पोलिस भरतीच्या धर्तीवर बोगस भरतीचे आयोजन करण्यात आले होते. उमेदवारांची कागदपत्रं गोळा करून 1200 मीटर धावणे आणि गोळा फेक यांसारख्या मैदानी चाचण्या घेण्यात आल्या. पात्र ठरलेल्या 92 उमेदवारांना 25 डिसेंबर रोजी अंतिम प्रक्रियेसाठी 6 हजार रुपये घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले होते.
फसवणुकीचा भांडाफोड
उमेदवारांना संशय आल्याने त्यांनी या भरतीविषयी परवानगी आणि कागदपत्रांची मागणी केली. आरोपींचे उत्तर चुकताच उमेदवारांनी त्यांना पकडून सिटी चौक पोलीस ठाण्यात हजर केले. तपासादरम्यान आरोपींनी 11 महिन्यांच्या कंत्राटी नोकरीसाठी 12 हजार मासिक पगाराचे आमिष दाखवले असल्याचे उघड झाले.
विशाल मोहन देवळीचा भाऊ लष्करात असल्याने तो आणि विकास बारावी शिक्षण असूनही लष्करी गणवेश घालून उमेदवारांचा विश्वास संपादन करत होते. मात्र काही तरुणांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला.
आता जेलची हवा
सिटी चौक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानंतर निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना अटक करण्यात आली. तीनही आरोपींवर कारवाई सुरू असून त्यांच्या या फसवणुकीमुळे अनेक तरुणांचे नुकसान होण्यापासून वाचले आहे.
सावधानतेचा इशारा
तरुणांनी नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*