छत्रपती संभाजीनगर: शहरातील प्रतिष्ठित आर. सी. बाफना ज्वेलर्समध्येच विश्वासघाताची घटना उघडकीस आली आहे. या दालनातील सहायक व्यवस्थापकाने जवळपास पावणेतीन किलो सोन्याचे दागिने अवघ्या दीड महिन्यात लंपास केले. संदीप प्रकाश कुलथे (रा. भानुदासनगर) असे आरोपीचे नाव असून, जिन्सी पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करताच त्याला अटक केली आहे.
संदीप कुलथे दीड वर्षांपूर्वी आर. सी. बाफना ज्वेलर्सच्या आकाशवाणी चौकातील दालनात सहायक व्यवस्थापक म्हणून रुजू झाला होता. त्याच्याकडे रिद्धी-सिद्धी डेस्कची जबाबदारी होती. या डेस्कद्वारे विक्री होणाऱ्या तसेच शिल्लक राहिलेल्या दागिन्यांचा हिशेब ठेवण्याचे काम त्याच्यावर सोपवण्यात आले होते. मात्र, २४ ऑक्टोबर ते २४ डिसेंबर २०२४ या दोन महिन्यांच्या कालावधीत कुलथेने नियोजनबद्ध पद्धतीने दागिने लंपास केले.
सीसीटीव्हीतून उघड
दागिन्यांच्या हिशेबात मोठी तफावत आल्याने व्यवस्थापनाने तपास सुरू केला. अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेर्यांमधून या प्रकाराचा उलगडा झाला. या चौकशीत कुलथेने २२ आणि २४ कॅरेटचे २६४.०८ ग्रॅम वजनाचे ७ कडे, ४७०.३९ ग्रॅम वजनाच्या १३ सोनसाखळ्या, १२८७.३२ ग्रॅम वजनाच्या ५० सोनसाखळ्या आणि ६५६.५३ ग्रॅम वजनाचे १७ ब्रेसलेट चोरल्याचे उघड झाले.
१.९३ कोटींचा ऐवज चोरीला
व्यवस्थापनाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, चोरीला गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत १ कोटी ९२ लाख ९० हजार २९० रुपये असल्याचे नमूद केले आहे. दालनाचे व्यवस्थापक विनोदकुमार दिलीपसिंग चौधरी यांनी जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा तपास जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाडे करत आहेत. व्यवस्थापनाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संदीप कुलथे याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*