छत्रपती संभाजीनगर :शहरातील प्रोझोन मॉल, शहानूरमियाँ दर्गा परिसर आणि घाटी व एमजीएम रुग्णालयाच्या आवारातून दुचाकी चोरी करणाऱ्या पवन रामचंद्र सुरासे (२३, रा. मुठाड, भोकरदन, ह.मु. रामनगर, मुकुंदवाडी) याला एमआयडीसी सिडको पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यांत त्याने चोरलेल्या १५ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून, आणखी काही दुचाकी हस्तगत होण्याची शक्यता आहे.
गेल्या तीन वर्षांपासून शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यावर्षीच्या ११ महिन्यांतच ८९० हून अधिक दुचाकी चोरीला गेल्या आहेत. यातील प्रोझोन मॉलसमोरील दुचाकी चोरीच्या तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पवन सुरासे दिसला. २१ डिसेंबर रोजी गस्तीदरम्यान पोलिसांनी फुटेजमधील कपड्यांतील पवनला संशयास्पद स्थितीत पकडले. त्याच्याकडील दुचाकी एमजीएम रुग्णालयासमोरून चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांच्या चौकशीत त्याने १५ दुचाकी चोरीची कबुली दिली. उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहायक आयुक्त सुदर्शन पाटील, निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक भरत पाचोळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
स्वतःच्या गावकऱ्यांना फसवणूक:
पवनने चोरलेल्या दुचाकी स्वतःच्या गावातील शेतकऱ्यांना २०-२५ हजार रुपयांत विकल्या. फायनान्स कंपनीने हप्ते थकल्याने गाड्या जप्त केल्याचे खोटे सांगत त्याने या गाड्या विकल्या होत्या.
प्रेमविवाहानंतर चोरीचा मार्ग:
पवनने काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या पवनने नोकरीच्या निमित्ताने शहरात येत पेट्रोल पंपावर नोकरी केली, मात्र ती सोडून चोरी सुरू केली. पती चोरी करत असल्याचे समजल्यावर पवनची पत्नी पोलिस ठाण्यात आल्यावर रडू लागली.
पवनकडून आणखी चार दुचाकी हस्तगत होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. चोरीच्या या साखळीमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*