छत्रपती संभाजीनगर : आई-वडिलांसोबत झालेल्या वादानंतर रागाच्या भरात होस्टेल सोडून पळालेल्या १७ वर्षीय मुलीवर चार वेगवेगळ्या जिल्ह्यांत चार तरुणांनी मदतीच्या बहाण्याने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वेदांतनगर पोलिसांनी मुलीचा शोध घेतल्यानंतर तिने स्वतःच ही माहिती दिली. याप्रकरणी समाधान शिंदे (२७, पुणे), निखिल बोर्डे (२६, नाशिक), प्रदीप शिंदे (२७, परभणी) आणि रोहित ढाकरे (२४, पुसद) यांना अटक करण्यात आली आहे.
नीट परीक्षेची तयारी करणारी १७ वर्षीय मुलगी शहरातील एका खासगी होस्टेलमध्ये राहून अभ्यास करत होती. अभ्यासाच्या तणावातून तिचा आई-वडिलांसोबत वाद झाला, आणि ती ३० नोव्हेंबर रोजी होस्टेलमधून निघून गेली. तिने होस्टेल वॉर्डनला प्रकृती ठीक नसल्याचे सांगून घरी चालल्याचे लिहून दिले होते. मुलगी गायब झाल्याचे लक्षात येताच आई-वडिलांनी वेदांतनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रविणा यादव यांची भेट घेतली. पोलिसांनी तत्काळ अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
तांत्रिक तपासात मुलगी पुण्यात असल्याचे समजले. तेथे पोहोचून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने पळून जाण्याचे कारण सांगितले आणि तिच्यासोबत घडलेल्या अत्याचाराची माहिती दिली.
होस्टेल सोडल्यावर मुलगी सर्वप्रथम परभणीला गेली. तेथे रेल्वे स्थानकावर प्रदीप शिंदे या तरुणाने तिला राहण्याचे आमिष दाखवून अत्याचार केला. त्यानंतर त्यानेच तिला पुसद येथे पाठवले. पुसद येथे रोहित ढाकरे या ओळखीच्या तरुणाने तिला पुढे जाण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने अत्याचार केला.
नंतर मुलगी नाशिकला गेली, जिथे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या निखिल बोर्डेने तिला जेवण व राहण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. शेवटी, ती पुण्याला पोहोचली, जिथे समाधान शिंदे या टॅक्सीचालकाने तिच्यावर अत्याचार केला.
मुलीने प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे सीमकार्ड खरेदी करून ठराविक वेळी मोबाइल सुरू केला. त्यामुळे पोलिसांना ती शोधण्यात अडचण येत होती. लोकेशनच्या आधारे शोध घेत पोलिसांनी तिला पुण्यात सापडलेल्या ठिकाणी ताब्यात घेतले.
वेदांतनगर पोलिसांच्या तीन पथकांनी तातडीने कार्यवाही करत चारही आरोपींना अटक केली. आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे, अशी माहिती निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली.
ही घटना समाजाला गंभीर विचार करण्यास भाग पाडणारी आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*