छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलीसोबत मैत्रीच्या बहाण्याने जवळीक साधून ब्लॅकमेल करणाऱ्या एका आरोपीला मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव सुनील बळीराम मिमरोट (वय २७, रा. रोहिदासनगर, गल्ली क्र. १) असे आहे.
पोलिस निरीक्षक शिवाजी तावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय पीडित मुलीसोबत आरोपीने २०२२ पासून मैत्री केली होती. सुरुवातीला फोनवर आणि समक्ष भेटीतून त्यांच्यात संवाद होत असे. मात्र, ऑक्टोबर २०२४ मध्ये मुलीने आरोपीसोबत बोलणे बंद केले.
यामुळे सुनीलने तिचा पाठलाग करत रस्त्यात तिला त्रास देणे सुरू केले. त्याने पीडितेला धमकी दिली की, “तू माझ्यासोबत बोल, अन्यथा तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीन.” धमकीनंतरही पीडित मुलगी नकारात्मक राहिल्यावर आरोपीने २७ ऑक्टोबर रोजी तिचे फोटो व्हायरल केले.
पीडितेच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी शनिवारी (दि. २१) हसनाबाद येथून आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला २४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*