छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयातील गंभीर आणि अत्यवस्थ रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ५० खाटांचे अत्याधुनिक क्रिटिकल केअर युनिट उभारण्यात येणार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून गुरुवारी (दि. १२) भूमिपूजन सोहळा पार पडला.
सर्व सुविधा असलेले आधुनिक युनिट
आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशनअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी हे ५० खाटांचे क्रिटिकल केअर हॉस्पिटल मंजूर करण्यात आले आहे. प्रत्येक खाट व्हेंटिलेटर आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असेल. या युनिटमध्ये गंभीर आजारांवरील उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक केली जाणार आहे.
अतिविशेष उपचार सुविधांचा फायदा
घाटी रुग्णालयात सध्या सुरू असलेल्या डीएम, एमसीएच अभ्यासक्रमांमुळे रुग्णांना अतिविशेषज्ञांकडून उपचार मिळत आहेत. या युनिटमुळे आणखी दर्जेदार उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यावेळी भूमिपूजन सोहळ्याला अभ्यागत समितीचे अध्यक्ष आ. प्रदीप जैस्वाल, घाटी रुग्णालय अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
१५ मजली सर्जिकल इमारतीसाठी प्रस्ताव
सध्याच्या सर्जिकल इमारतीची अवस्था जीर्ण झाल्याने घाटी प्रशासनाने १५ मजली नवीन सर्जिकल इमारत उभारण्यासाठी राज्य शासनाकडे ८३४ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. या इमारतीत पुढील शंभर वर्षे अत्याधुनिक आरोग्यसेवा दिली जाईल, असा घाटी प्रशासनाचा विश्वास आहे.
आरोग्य क्षेत्रात नवा अध्याय
या नवीन क्रिटिकल केअर युनिटमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळणार असून गंभीर रुग्णांचे प्राण वाचवण्यास मोठा हातभार लागणार आहे, असे मत घाटी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी व्यक्त केले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*