राज्यात थंडीचा जोर वाढत असून, याचा लहान मुलांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तापमान 12 अंशांपर्यंत खाली आले आहे, ज्यामुळे लहान मुलांना थंडीत शाळेत जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीचा विचार करून जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागाने तातडीने पाऊल उचलले आहे.
शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळा आणि संस्थाचालकांना सकाळी 9 वाजल्यानंतरच शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश तत्काळ लागू करण्यात आला असून, त्याचे पालन न केल्यास संबंधित शाळा व्यवस्थापनावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
डिसेंबर महिन्यात थंडीची लाट राज्यभर पसरली आहे. लहान मुलांना थंडीत शाळेत जाण्यासाठी सकाळी लवकर घराबाहेर पडावे लागत असल्याने त्यांना आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. थंडीमुळे सर्दी, ताप, श्वसनाच्या समस्या वाढण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत सकाळी 9 नंतर शाळा सुरू केल्याने मुलांना थोडीशी दिलासा मिळेल आणि त्यांच्या आरोग्याचे संरक्षण करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या या निर्णयामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे. इतर जिल्ह्यांमध्येही थंडीचा कडाका वाढल्याने पालक आणि शिक्षक अशाच प्रकारच्या निर्णयांची मागणी करत आहेत. शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने तो संपूर्ण राज्यभर लागू करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या निर्णयामुळे मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून सकारात्मक प्रयत्न होत आहेत. पालकांनीही मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. थंडीत मुलांना उबदार कपडे घालण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*