छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. सध्या प्रति १००० मुलांमागे फक्त ८८९ मुली असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. हे प्रमाण सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याची घोषणा करण्यात आली. अशा प्रकरणांची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाल्यास, माहिती देणाऱ्यास पारितोषिक स्वरूपात १ लाख रुपये देण्याची तरतूद केली आहे. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाईल.
तक्रार नोंदवण्यासाठी http://amchimulgimaha.in या संकेतस्थळावर तक्रार करता येईल. याशिवाय १८०० २३३ ४४७५ या टोल फ्री क्रमांकावरही नागरिक तक्रार देऊ शकतात.
महिला सक्षमीकरण व कायद्यांची अंमलबजावणी
जिल्ह्यात महिलांचे सक्षमीकरण व त्यांच्या संरक्षणासाठी प्रभावी पावले उचलण्याचे आदेशही बैठकीत देण्यात आले. महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, आणि इतर संबंधित विभागांनी संयुक्तपणे काम करून ग्रामपातळीपर्यंत जनजागृती कार्यक्रम राबवावेत, असे निर्देश देण्यात आले.
बालविवाह रोखणे, महिलांचे हक्क व सक्षमीकरण, तसेच मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये महिला सुरक्षितता सर्वेक्षण सुरू करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले आहेत.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, तसेच विविध विभागांचे अधिकारी व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी नागरिकांना आवाहन केले की, मुलींच्या हक्कांचे संरक्षण व त्यांचे भविष्य घडवण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*