छत्रपती संभाजीनगर: अलखैर बैतुल माल नागरी सहकारी पतसंस्थेच्या नावाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पतसंस्थेचे व्यवस्थापक सय्यद हबीबउल्लाह सय्यद अहमदउल्लाह (वय ५१, रा. अल अमिन सोसायटी, एन-१२ सिडको, रोजाबाग) यांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, बनावट फेसबुक प्रोफाईल, मोबाइल नंबर, आणि बँक खात्यांचा वापर करून आरोपीने पतसंस्थेच्या नावाने लोकांची दिशाभूल केली. यामार्फत लोकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळण्यात आले. फसवणूक झालेल्या लोकांनी पतसंस्थेच्या कार्यालयात तक्रारी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
पतसंस्थेच्या नावाचा आणि ओळखदर्शक बाबींचा गैरवापर करून केलेल्या या फसवणुकीमुळे अनेक लोक आर्थिक अडचणीत आले आहेत. तक्रारदाराने पतसंस्थेच्या कार्यालयात जमा झालेल्या तक्रारी व संबंधित पुरावे तपासासाठी पोलिसांना सादर केले आहेत.
सायबर पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी पोनि शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपीवर भारतीय दंड विधान आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे, आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.
सायबर गुन्हेगारीतील वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहून अशा फसवणुकीपासून स्वतःला दूर ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*