छत्रपती संभाजीनगर – नागपूर येथे उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या कबरीच्या मुद्यावरून राज्यात वातावरण तापले असून, हिंदुत्ववादी संघटनांनी ही कबर हटवण्याचा इशारा दिला आहे. परिणामी, पोलिसांनी या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
सध्या या ठिकाणी 1 उपविभागीय पोलिस अधिकारी, 3 पोलिस निरीक्षक, 1 एसआरपीएफची तुकडी, 120 हून अधिक होमगार्ड जवान, स्थानिक पोलिस ठाण्याचे सर्व कर्मचारी तसेच साध्या वेशातील पोलिस तैनात आहेत. तसेच, कबर परिसरातील सुरक्षेसाठी चारही बाजूंनी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला आहे.
पर्यटकांवर कडक नजर
खुलताबाद शहरात येणाऱ्या प्रमुख मार्गांवर पोलिसांनी बॅरिकेडिंग लावून वाहनांची व नागरिकांची तपासणी सुरू केली आहे. विशेषतः, औरंगजेबाच्या कबरीला भेट देणाऱ्या पर्यटकांची कसून तपासणी केली जात आहे. पर्यटकांचे नाव, मोबाईल नंबर व आधार कार्ड तपासले जात असून, त्याची नोंदही घेतली जात आहे. याशिवाय, कबरीच्या परिसरात मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
या कडक तपासणीमुळे पर्यटकांची संख्याही घटली आहे. रविवारी 70, सोमवारी 60 आणि मंगळवारी दुपारी 12 वाजेपर्यंत केवळ 9 पर्यटकांनी कबरीला भेट दिली. यासंबंधीची अधिकृत आकडेवारी पोलिसांच्या नोंदवहीत नोंदवण्यात आली आहे.
नागपूर हिंसाचाराचे पडसाद खुलताबादमध्ये?
नागपूर येथे सोमवारी रात्री औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून मोठा हिंसाचार झाला. त्यामुळे या घटनेचे पडसाद खुलताबादमध्ये उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर खुलताबादमधील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवले असून, कोणत्याही संशयास्पद हालचालींवर करडी नजर ठेवली जात आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असल्याने औरंगजेबाच्या कबरीभोवती आता छावणीसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
पोलीस सतर्क, नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन
संपूर्ण घटनाक्रम पाहता प्रशासनाने कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. पोलिसांनी नागरिकांना गैरसमजातून अफवा पसरवू नका, कायदा हातात घेऊ नका, शांतता राखा, प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन केले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, पोलिस यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*