गजानन राऊत : प्रतिनिधी /वाळूजमहानगर : पाण्याची बाटली न दिल्याच्या कारणावरून एका महिलेची छेडछाड करून तिच्या पती व मुलाला मारहाण करण्यात आली. तसेच घराबाहेर उभी असलेली दुचाकी फोडून नुकसान करण्यात आले. ही घटना रविवारी (ता. 16) विटावा येथे घडली.
पीडित महिला पती व मुलासह विटावा येथे राहते. तिचा किराणा दुकानाचा व्यवसाय आहे. रविवारी दुपारी 1:30 वाजता आरोपी योगेश चिंधे हा दारूच्या नशेत तिच्या दुकानात आला आणि पाण्याची बाटली मागू लागला. महिलेने त्याला पाणी न दिल्याने संतापून त्याने शिवीगाळ केली आणि तिचे हात पकडून जबरदस्ती केली. महिलेने प्रतिकार करत त्याच्या हातावर झटका दिला आणि आरडाओरड केली.
पीडितेच्या आवाजाने तिचे पती व मुलगा घराबाहेर आले. त्यावेळी आरोपीने बाहेर उभी असलेली दुचाकी फोडली. एवढ्यावरच न थांबता, आरोपीच्या गाडीत बसलेले त्याचे साथीदार रमेश घुगे, गोविंदा चव्हाण आणि बाबासाहेब गिरबोने हे तिघे उतरले आणि महिलेच्या पती व मुलाला लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर पीडित महिलेने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी योगेश चिंधे व त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*