छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकातील फर्निचर मार्केटमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत 10 हून अधिक दुकाने जळून खाक झाली असून लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी अग्निशमन दलाचा तातडीने दाखल
आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने अग्निशमन दलाला कळवले. मात्र, अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचेपर्यंत आगीने 7 ते 8 दुकानांना वेढले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आग पहाटे 4 च्या सुमारास लागली. मुख्यतः फर्निचरची दुकाने असल्याने लाकूड आणि इतर ज्वलनशील पदार्थांमुळे आगीने काही वेळातच उग्र स्वरूप धारण केले.
स्थानिकांचा मदतीसाठी पुढाकार
आगीची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. परंतु तोपर्यंत लाखोंच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. दुकानातील लाकडी सामान, फर्निचर, गादी-गाद्या, फोमचे साहित्य आदी पूर्णपणे जळून गेले.
आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
या आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. काही स्थानिकांच्या मते शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, तर काहींनी ही आग संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. याबाबत अधिकृत तपास सुरू आहे.
व्यापाऱ्यांमध्ये संताप आणि चिंता
आग लागल्यामुळे व्यापारी हवालदिल झाले आहेत. अनेक दुकानदारांचे संपूर्ण दुकान भस्मसात झाल्याने मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*