पैठण : पैठण येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रोत्सवाला यंदाही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत. १८ मार्च ते २२ मार्च या कालावधीत हा यात्रोत्सव पार पडणार असून, या काळात पैठणकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहावी व वाहतुकीची कोंडी टाळावी, यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी जड वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.
पर्यायी जड वाहतूक मार्ग
१) शहागड – पाचोड मार्ग:
- शहागड मार्गे येणारी वाहतूक पाचोडमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे वळवण्यात येणार आहे.
- तसेच, पाचोड – आडूळ मार्गे येणारी वाहतूक छत्रपती संभाजीनगर बायपासमार्गे अहिल्यानगरकडे जाईल.
2. सोलापूर – धुळे महामार्ग (NH-52):
- बीडकडून येणारी जड वाहतूक एनएच-५२ मार्गाने सरळ पुढे ए-एस क्लबमार्गे छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर हायवेने अहिल्यानगरकडे वळवली जाईल.
- तसेच, याच मार्गाने परतीची वाहतूक नियोजनबद्ध केली जाणार आहे.
3. जालन्याकडून येणारी वाहतूक:
- जालना मार्गे येणारी वाहतूक करमाड, कचनेर फाटा, सोलापूर-धुळे एनएच-५२ महामार्गाने पुढे सरळ जाऊन ए-एस क्लबमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे किंवा अहिल्यानगरकडे जाणार आहे.
- तसेच, याच मार्गाने परतीच्या वाहनांची सोय करण्यात आली आहे.
भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
संत एकनाथ महाराज यांची नाथषष्ठी यात्रा ही वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण यात्रा आहे. लाखो भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना वाहतूक नियमानुसार प्रवास करण्याचे आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
पोलीस यंत्रणेची विशेष व्यवस्था
यात्रोत्सव काळात वाहतूक पोलिसांच्या विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, विविध ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यात्रेच्या निमित्ताने अतिरिक्त पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
भाविकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे आणि शांततेत यात्रेचा आनंद घ्यावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*