छत्रपती संभाजीनगर : शहर व परिसरात गेल्या पाच दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. चिकलठाणा वेधशाळेने बुधवारी कमाल तापमान ४२.५ अंश सेल्सिअस नोंदवले असून, यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वात अधिक तापमान आहे. दरवर्षी एप्रिल अखेरीस जे तापमान असते, ते यंदा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात गाठल्याने पुढील काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
पाच दिवसांत तापमानात ३.१ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. ५ एप्रिल रोजी ३९.४ अंश असलेले तापमान ९ एप्रिल रोजी ४२.५ अंशांवर पोहोचले. यामुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य दिसू लागले असून, नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक झाले आहे.
उष्णतेशी लढण्यासाठी प्रशासन सज्ज
वाढत्या तापमानामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य व नागरी समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि. १७ एप्रिल) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत.
जिल्ह्यातील ५३ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी ही माहिती दिली.
उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी जनजागृती गरजेची
हवामानशास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले की, “एप्रिलअखेरचे तापमान पहिल्याच आठवड्यात नोंदवले जात असल्याने पुढील काळात तापमानाचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, तसेच शासनानेही तातडीने जनजागृती मोहीम राबवणे गरजेचे आहे.”
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*