विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर चार उमेदवारांनी त्यांच्या मतदारसंघातील १२ ईव्हीएम मशीन तपासणीसाठी निवडणूक विभागाकडे ५ लाख ६६ हजार ४०० रुपये जमा केले आहेत. जिल्हा प्रशासनाने सोमवारी याबाबतची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविली आहे.
ईव्हीएम तपासणीची तारीख नवीन वर्षात, म्हणजेच जानेवारी २०२५ मध्ये निश्चित होण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेमध्ये आक्षेप घेणाऱ्या उमेदवारांच्या उपस्थितीत मतदान आणि मतमोजणीची तपासणी केली जाईल.
नियमांनुसार निवडणुकीत पराभूत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना एकूण मतदान केंद्रांपैकी पाच टक्के केंद्रांच्या ईव्हीएम मशीन तपासणीची मागणी करता येते. यानुसार, सहा उमेदवारांनी ईव्हीएम तपासणीसाठी अर्ज केला होता. मात्र, त्यापैकी दोन अर्ज फेटाळण्यात आले.
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील उद्धवसेनेचे उमेदवार राजू शिंदे यांनी ६ मशीनसाठी २ लाख ८३ हजार रुपये जमा केले आहेत.
औरंगाबाद मध्यचे उमेदवार बाळासाहेब थोरात आणि एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दीकी, तसेच वैजापूरचे डॉ. दिनेश परदेशी यांनी प्रत्येकी २ मशीनसाठी ९४ हजार ४०० रुपये भरले आहेत.
मॉकपोलसारखी असेल प्रक्रिया:
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, भेल (भारत इलेक्ट्रॉनिक लि.) च्या अभियंत्यांच्या उपस्थितीत उमेदवारांनी मागणी केलेल्या ईव्हीएम मशीन गोदामातून बाहेर काढल्या जातील. मशीनमधील जुना डेटा डिलीट करून बॅलेट युनिटवर डमी मतपत्रिका लावली जाईल. यानंतर मॉकपोलच्या धर्तीवर मतदान प्रक्रिया राबवली जाईल.
प्रत्येक मशीनवर १४०० मतांची नोंद केली जाईल आणि ती मतमोजणी प्रक्रियेप्रमाणेच मोजली जाईल. यावेळी उमेदवारांना त्यांच्या मतांची नोंद ईव्हीएममध्ये अचूक आहे की नाही, हे तपासण्याची संधी मिळेल. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत पडलेल्या मतांची व व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची तपासणी होणार नाही.
निवडणुकीतील पारदर्शकतेसाठी महत्त्वाचे पाऊल:
ईव्हीएम तपासणीची प्रक्रिया निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. या प्रक्रियेमुळे उमेदवारांना त्यांच्या शंका दूर करण्याची संधी मिळेल.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/K9Y55vdUS298mQnTz6IgYT
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*