छत्रपती संभाजीनगर : दोन भूखंडांची फेर महसूल दप्तरी नोंद करण्यासाठी तलाठ्याच्या वतीने ५ हजार रुपयांची लाच घेताना एका खाजगी एजंटास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (५ मे) रंगेहात पकडले. ही कारवाई गांधेली येथील तलाठी सज्जा कार्यालयात करण्यात आली. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

देविदास भाऊराव बकाल (वय ५२, रा. मयूर पार्क) आणि तलाठी विनोद शेषराव मुळे (वय ४९) अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदार महिलेच्या पतीच्या नावे गांधेली शिवारातील गट नंबर १३३ मधील भूखंड क्रमांक ४० आणि ४१ बाबत फेर नोंदणीसाठी अर्ज केला होता. मात्र, एक महिना उलटूनही तलाठी मुळे यांनी संबंधित फेर नोंद घेतली नव्हती व लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची तक्रारदार महिलेची इच्छा नसल्यामुळे  तक्रारदार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार तलाठी मुळे आणि एजंट बकाल हे मिळून लाचेची मागणी करीत होते. एसीबीने प्राथमिक पडताळणीनंतर सापळा रचला. ५ मे रोजी एजंट देविदास बकाल याने तक्रारदार महिलेकडून ५ हजार रुपये घेताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात अटक केली. ही रक्कम तलाठी व एजंट दोघांसाठी मागितल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शांतीलाल चव्हाण, हवालदार रवींद्र काळे, अशोक नागरगोजे यांच्या पथकाने पार पाडली. सरकारी कामात अडथळा आणत लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,160 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क