छत्रपती संभाजीनगर: सततच्या मानसिक छळाला कंटाळून अतिया बेगम शेख शहानूर (वय ३६, रा. रेंगटीपुरा, जुना मोंढा) या विवाहितेने अंगावर डिझेल ओतून आत्महत्या केली. रविवारी (८ डिसेंबर) रात्री घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय व जिन्सी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
२० वर्षे संसारानंतरही छळ कायम:
अतियाचे २००३ साली लग्न झाले होते. तिला चार मुलं असून ती घरातील जबाबदाऱ्या निभावत होती. मात्र तिची सासू व दोन नणंदा सतत तिचा मानसिक छळ करत असल्याचे समोर आले आहे. “तू चांगले जेवण करत नाहीस, नातेवाईकांना मान-सन्मान देत नाहीस” असे कारण देत तिला टोमणे मारले जात होते. या त्रासाबद्दल तिने वडिलांकडे तक्रार केली, मात्र “अशा गोष्टी संसारात चालत असतात” असे सांगून तिला समजावले गेले.
५ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून अतियाने अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. तिला गंभीर अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र पाच दिवसांनंतर तिचा मृत्यू झाला.
नातेवाईकांचे आंदोलन:
अतियाच्या मृत्यूनंतर तिच्या संतप्त नातेवाईकांनी आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. या कारणाने घाटी रुग्णालयात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गौतम वावळे करत आहेत. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*