छत्रपती संभाजीनगर: शहरातील व्यावसायिक मालमत्ताधारकांकडून १ लाखांहून अधिक मालमत्ता कर थकीत असल्यास त्यांची मालमत्ता सील करण्याचे आदेश महापालिकेच्या सर्व झोन कार्यालयांना देण्यात आले आहेत. मंगळवारी या आदेशांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.
महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी मार्च २०२५ पर्यंत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीचा आकडा ५०० कोटींपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार, सर्व झोन कार्यालयांनी १ लाख ते १० लाख किंवा त्याहून अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांची यादी तयार केली असून वसुलीची मोहीम हाती घेतली आहे.
थकबाकीदारांवर कठोर कारवाई
व्यावसायिक मालमत्ता सील करण्यात येत असून, निवासी मालमत्तांसाठी जप्तीच्या नोटिसा बजावल्या जात आहेत. याशिवाय थकीत करावर २४ टक्के व्याज आकारले जात आहे. मागील चार वर्षांपासून व्याजावर मिळणारी ७५ टक्के सूट बंद करण्यात आल्यामुळे अनेक मालमत्ताधारक कर भरण्यास टाळाटाळ करत आहेत.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
महापालिकेने गुगल मॅप आणि ड्रोन सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून कर नोंदणीकडे दुर्लक्ष झालेल्या मालमत्तांना कराच्या कक्षेत आणले आहे. कर लावण्यासाठी सहकार्य न करणाऱ्या मालमत्ताधारकांना ड्रोन सर्व्हेच्या आधारे कर लावण्यात येत आहे.
झोन क्रमांक १ मधील अधिकाऱ्यांनी मंगळवारी बाजारपेठेतील पाच दुकाने सील केली. त्यापैकी तीन दुकानदारांनी धनादेशाद्वारे थकीत रक्कम भरल्यामुळे त्यांच्या दुकानांवरील सील काढण्यात आले. उर्वरित दोन दुकाने अद्याप सील आहेत. तीन मालमत्ताधारकांकडून ४ लाख ५५ हजार रुपयांची वसुली करण्यात आली असून, उर्वरित दोन मालमत्ताधारकांकडून ३ लाख ६ हजार रुपये अपेक्षित आहेत.
महापालिकेने थकीत कर वसुली मोहीम तीव्र केल्यामुळे शहरातील मालमत्ताधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*