शहरात नागरिकांपासून ते प्राणी आणि पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरणाऱ्या चायनीज म्हणजेच नायलॉन मांजाच्या विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी चार वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकत, संबंधित विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे, यात पुस्तक विक्रेते व टेक्निशियन यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.
सध्या पतंगोत्सवाचा हंगाम सुरू होत असल्याने पतंगासाठी घातक नायलॉन मांजाची मागणी वाढली आहे. मात्र, गेल्या दीड महिन्यात अशा मांजामुळे शहरात सहा नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये एका तरुण क्रिकेट खेळाडूचाही समावेश आहे. गतवर्षी उच्च न्यायालयाने नायलॉन मांजाच्या विक्रीवर कडक भूमिका घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर यंदा पोलिसांनी डिसेंबरपासूनच शोधमोहीम हाती घेतली आहे.
बुक स्टोअर व टेक्निशियनकडून मांजाची विक्री
गुन्हे शाखेने मंगळवारी मयूर पार्कमधील एका बुक स्टोअरवर छापा टाकला. तेथे पुस्तक विक्रेता राहुल बाबासाहेब औताडे नायलॉन मांजाची विक्री करताना आढळला. पोलिसांनी त्याच्याकडून चार चक्री मांजा जप्त केला.
तसेच, बजाजनगरमध्ये गणेश राजूसिंग चंदेल व किशोर उणे हे दोघे घातक मांजा विक्री करताना सापडले. त्यांच्याकडून सुमारे ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
याशिवाय, शाहगंज भागात टेक्निशियन सय्यद खिजरोद्दीन सय्यद सिराजोद्दीन याला १० मोठे मांजाचे बंडल विक्रीसाठी आणलेले असताना पोलिसांनी अटक केली.
या प्रकरणांमध्ये हर्सूल, एमआयडीसी वाळूज आणि सिटी चौक पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी नागरिकांना चायनीज मांजाचा वापर टाळण्याचे आवाहन केले असून, याविरोधात कडक कारवाई सुरू असल्याचे सांगितले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://whatsapp.com/channel/0029Va4nqKP3AzNK9P9Kza1a
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*