विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्र विधानपरिषद सभापतीपदासाठी निवडणूक पार पडली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांची एकमताने विधानपरिषद सभापतीपदी निवड झाली आहे.
विधानपरिषदेमध्ये आज सभापतीपदाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सर्व पक्षांनी एकमताने राम शिंदे यांच्या नावाला पाठिंबा दिला. सभापतीपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सर्व आमदारांनी त्यांचे अभिनंदन केले.
राम शिंदे हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून धनगर समाजाचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. २०१४ मध्ये त्यांनी फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, मात्र आता विधानपरिषदेच्या सभापतीपदावर त्यांची निवड झाली आहे.
शिवसेनेकडून उपसभापती निलम गो-हे यांना सभापतीपद देण्याची मागणी केली होती. मात्र भाजपने राम शिंदे यांचे नाव पुढे केले आणि आज सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा दिल्याने ते विधानपरिषदेचे सभापती झाले.
सभापतीपदाची खुर्ची स्वीकारल्यानंतर राम शिंदे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले आणि सभागृहाच्या कामकाजाचा दर्जा उंचावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://whatsapp.com/channel/0029Va4nqKP3AzNK9P9Kza1a
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*