छत्रपती संभाजीनगर : “देशात युद्धजन्य परिस्थिती आहे, अंगावर दागिने घालून फिरू नका,” असा सल्ला देत पोलिस असल्याचे भासवून दोन चोरट्यांनी ७५ वर्षीय वृद्धेची फसवणूक केली. गारखेडा परिसरात सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. चोरट्यांनी अवघ्या पाच मिनिटांत त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन, बांगड्या आणि अंगठी असा एकूण ९ तोळे ७ ग्रॅम वजनाचे दागिने लांबवले. जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या महिनाभरात अशा प्रकारची ही सहावी घटना आहे.

मंगला अनंता गंडागुळे (वय ७५, रा. सुखद सहवास कॉलनी, गारखेडा) या सकाळी घराजवळील रस्त्याने आंबे खरेदीसाठी गेल्या असता, २५ ते ३० वयोगटातील दोन तरुणांनी त्यांना थांबवले. ‘तुमचे नाव काय? तुम्ही कोठे राहता?’ असे विचारून, “देशात युद्धाचे वातावरण आहे, तुम्ही अंगावर दागिने घालून फिरता?” असे म्हणत भीती दाखवली. मंगला गंडागुळे यांनी ‘तुम्ही कोण?’ अशी विचारणा केली असता, “आम्ही पोलिसांचे लोक आहोत, आमचे अधिकारी समोर गाडीत आहेत, आम्ही जनतेच्या सुरक्षेसाठी काम करतो,” असे सांगत त्यांनी वृद्धेच्या मनात भीती निर्माण केली.

चोरट्यांनी तिच्या गळ्यातील तीन तोळ्याची चेन, हातातील सहा तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या आणि सुमारे सहा ग्रॅमची अंगठी काढून, ती आंब्याच्या पिशवीत ठेवत असल्याचे भासवले. त्यानंतर त्यांनी चतुराईने दागिने पिशवीत न ठेवता लंपास केले. घर गाठल्यावर पिशवी उघडून पाहिल्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ जवाहरनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

घटनास्थळ हे त्यांच्या घरापासून अवघ्या ५० फुटांवर असून, चोरट्यांनी संवादाच्या माध्यमातूनच त्यांना फसवले. या दागिन्यांची खरेदी त्यांनी ३० वर्षांपूर्वी केली होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

857 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क