छत्रपती संभाजीनगर: आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल 202 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. संचालक मंडळाने पोटनियमाविरुद्ध जाऊन विविध संस्थांना विनातारण कर्ज वाटप करून हा घोटाळा केल्याचे समोर आले होते. या प्रकरणामुळे हजारो ठेवीदारांचे पैसे अडकले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
घोटाळ्यामुळे त्रस्त झालेल्या हजारो ठेवीदारांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या प्रकरणात 50 ठेवीदारांच्या मृत्यूला “हत्या” ठरवत, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच फरार आरोपींना त्वरित अटक करण्याची, त्यांना मदत करणाऱ्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आणि आत्महत्या केलेल्या ठेवीदारांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
यापूर्वी ठेवीदारांनी मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढला होता, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपींची संपत्ती विकून ठेवीदारांना पैसे परत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत, ज्यामुळे ठेवीदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे यांच्यासह 50 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेने पतसंस्थेवर निर्बंध घातले असून, खातेदारांना पैसे काढण्यास मनाई केली आहे. नवीन कर्ज वाटपही थांबवण्यात आले आहे.
घोटाळ्यामुळे ठेवीदारांचे कष्टाचे पैसे अडकले असून, अनेक कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सरकार आणि प्रशासनाने लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत, अशी ठेवीदारांची मागणी आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*