फुलंब्री तालुक्यातील निधोना येथील काही गावकऱ्यांना बनावट न्यायालयीन नोटिसा पाठवून फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या तरुणास वेदांतनगर पोलिसांनी अटक केली आहे. गावकऱ्यांना न्यायालयाच्या नावे दंड आणि कर्जबुडीच्या नोटिसा पाठवून घाबरवण्याचा प्रयत्न करणारा शरद दिलीप नरवडे (वय २३) याला बुधवारी अटक करण्यात आली.
गावकऱ्यांना नोटिसा मिळाल्याने भीतीचे वातावरण:
सप्टेंबर महिन्यात निधोना गावातील काही लोकांना न्यायालयाच्या नावे नोटिसा प्राप्त झाल्या होत्या. प्रमुख न्यायाधीशांच्या सहीसह आलेल्या या नोटिसांमुळे गावकरी घाबरले होते. काहींनी तातडीने जिल्हा न्यायालयात धाव घेऊन तपास करण्याची मागणी केली. चौकशीत समजले की, या नोटिसा बनावट होत्या आणि त्यांचा उपयोग गावकऱ्यांना फसवण्यासाठी केला गेला होता.
खाते क्रमांकामुळे प्रकरण उघडकीस:
शरद नरवडे याच्या फसवणुकीचा पर्दाफाश त्याने पाठवलेल्या नोटिसांमधील चुकीच्या बँक खात्याच्या क्रमांकामुळे झाला. नोटिसांमध्ये नमूद केलेले बँक खाते न्यायालयाचे नसून शरदचेच असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. यावरून पोलिसांना त्याच्यावर संशय आला आणि त्याचा शोध सुरू करण्यात आला.
शरदचे काही महिन्यांपूर्वी सेतू सुविधा केंद्र बंद पडल्याने तो नाराज होता. त्याच्याकडे गावकऱ्यांचे आधार क्रमांक आणि इतर शासकीय माहिती होती, ज्याचा त्याने गैरवापर केला. शासकीय योजनांच्या पैशांवरून झालेल्या वादानंतर त्याने गावकऱ्यांना घाबरवण्यासाठी बनावट नोटिसा पाठवण्याचा कट रचला.
वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रविणा यादव यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक वैभव मोरे आणि त्यांच्या टीमने शरदला अटक केली आहे. गावकऱ्यांना घाबरवण्यासाठी बनावट नोटिसा पाठवणाऱ्या शरदविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*