सिडको एन-४ परिसरात नर्सरी शाळा चालवणाऱ्या ५९ वर्षीय महिलेची सायबर गुन्हेगारांनी ७२ हजार रुपयांनी फसवणूक केली. विद्यार्थ्याचे शुल्क भरण्याचा बहाणा करत काही मिनिटांत महिलेच्या खात्यातून पैसे काढण्यात आले. गुरुवारी महिलेने एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
ऑगस्ट महिन्यात महिलेला अज्ञात क्रमांकावरून कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने “खातून” नावाच्या विद्यार्थ्याचे पालक असल्याचे सांगून ८ हजार रुपये शुल्क पाठवल्याचे सांगितले. काही वेळानंतर महिलेला ८ ऐवजी ८० हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज मिळाला. काॅल करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, चुकून ८० हजार रुपये पाठवले गेले असून, ७२ हजार रुपये परत करण्याची विनंती केली. मेसेज बरोबर असल्यामुळे महिलेला विश्वास वाटला आणि तिने ७२ हजार रुपये परत पाठवले.
पैसे पाठवल्यानंतर महिलेला त्यांच्या शाळेत “खातून” नावाचा विद्यार्थी नसल्याचे लक्षात आले. त्यांनी बँकेचे स्टेटमेंट तपासले तेव्हा ८० हजार रुपये जमा झाल्याचे कोणतेही रेकॉर्ड नव्हते. गुन्हेगारांनी बनावट मेसेज पाठवून महिलेला फसवले होते.
गुन्हेगारांकडे महिलेसह शाळेची सर्व माहिती होती. त्यांनी बँकेकडून येणाऱ्या मेसेजप्रमाणे बनावट मेसेज पाठवून महिलेला गंडवले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर अधिक तपास करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*