छत्रपती संभाजीनगर: खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कडक प्रतिबंध लागू केले असून, संपूर्ण परिसरात कडेकोट उपाययोजना राबवण्यात येत आहेत. कबरीपासून ५० मीटर अंतरावर बॅरिकेड लावण्यात आले असून, तिथे १५ पोलिस तैनात आहेत. तसेच, या परिसरात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांची चार वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी केली जात आहे.
पोलिस प्रशासनाने सुरक्षेसाठी कबरीच्या परिसरात १७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून, संरक्षक भिंतीवर तारेचे कुंपण लावले जात आहे. तसेच, पर्यटकांना मोबाइल बाहेर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कबरीच्या ठिकाणी फोटो किंवा रील्स काढण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
जमावबंदीचे आदेश लागू
छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पाच किंवा त्याहून अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचे निदर्शने, मोर्चे किंवा मिरवणुका काढण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
पर्यटकांची ओळख नोंदणी आवश्यक
सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी मुख्य चार रस्त्यांवर बॅरिकेड लावून तपासणी सुरू केली आहे. कबरीला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंदणी करण्यात येत असून, त्यांचा नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक आणि आधार किंवा पॅन कार्डची नोंद घेतली जात आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका – पोलिस प्रशासन
पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी स्पष्ट केले आहे की, कोणत्याही पर्यटकांवर बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर अफवा पसरवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*