छत्रपती संभाजीनगर : खासदार निधीतून काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत शहरातील एका व्यावसायिकाला तब्बल ५६ लाख ३८ हजार ९९८ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात भारत राजू शेंडगे, आश्विन जाधव व एक महिला या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणुकीची संपूर्ण कहाणी

फिर्यादी हे बांधकाम क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी २०२१ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची परवाना घेत के. बी. एंटरप्रायझेस नावाने फर्म स्थापन केली होती. त्यानंतर भारत शेंडगे यांची ओळख झाली. शेंडगे याने त्यांना विश्वासात घेत सांगितले की, खासदार पुत्र हर्षवर्धन कराड यांच्याशी आपले निकटचे संबंध आहेत आणि खासदार निधीतून मोठी कामे मिळवून देता येतील.

या आमिषाला बळी पडून फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांनी वेळोवेळी रोख व ऑनलाइन स्वरूपात एकूण ५६.३८ लाख रुपये दिले. शेंडगे याने त्यांना एक कोटी रुपयांची कामे मिळाल्याचे सांगत नुतन कॉलनीतील जिल्हा न्यायालयासमोरील रस्त्याचे काम दाखवले. तसेच, वर्क ऑर्डर लवकर मिळणार असल्याचे सांगून वेळोवेळी पैसे उकळत राहिला.

वेगवेगळ्या कारणांसाठी घेतले पैसे

शेंडगे याने सुरुवातीला १२,५०० रुपये प्रोसेसिंग शुल्क म्हणून घेतले. त्यानंतर काम सुरू करण्याच्या बहाण्याने वेळोवेळी १,५००, ५,०००, ११,००० असे पैसे घेत राहिला. सप्टेंबर २०२३ मध्ये त्याने “काम मिळाले आहे” असे सांगून आनंदात मिठाई वाटली. मात्र, काही दिवसांनी आणखी पैशांची मागणी केली.

फिर्यादीने घरातील सोन्याचे दागिने तारण ठेवून आणि विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज काढून तब्बल ५६ लाख रुपये उभे केले आणि शेंडगेला दिले. त्याने पैसे घेतल्यानंतर “लवकरच वर्क ऑर्डर मिळेल” असे सांगितले. मात्र, काही महिने उलटूनही कामाच्या कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता झाली नाही.

फिर्यादीला संशय, पोलिसांकडे धाव

वारंवार विचारणा करूनही कामाचे कोणतेही ठोस पुरावे न मिळाल्याने फिर्यादीला शंका आली. त्यांनी थेट खासदार कराड यांच्या कार्यालयात जाऊन विचारणा केली असता, शेंडगे यांना कोणतेही काम दिले नसल्याचे उघड झाले.

यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, फिर्यादीने वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तपासानंतर शेंडगे, आश्विन जाधव आणि एक महिला यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुन्हेगारीचा भाग असल्याचे मानले जात असून, या प्रकरणातील आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी  खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,008 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क