गुन्हेगारी जगताच्या आकर्षणातून ‘लेडी डॉन’ बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राखी गणेश मुरमुरे (वय २४) या तरुणीला रविवारी रात्री सिटी चौक पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी तिच्या निवासस्थानी छापा टाकून एक गावठी कट्टा, जिवंत काडतुसे व तीन चाकू जप्त केले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून एक तरुणी हवेत गोळीबार करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सिटी चौक पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांना ही माहिती मिळाल्यानंतर सहायक निरीक्षक मनीषा हिवराळे, उपनिरीक्षक निवृत्ती गायके यांच्या नेतृत्वाखाली पथकाने भडकल गेट येथे सापळा रचला. राखी गेटजवळ येताच पोलिसांनी तिला चारी बाजूंनी घेरले आणि ताब्यात घेतले. अंगझडतीत तिच्याकडे एक धारदार चाकू सापडला.
त्यानंतर पोलिसांनी तिच्या एन-१२ येथील खोलीची तपासणी केली. येथे पोलिसांना गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, आणि तीन धारदार चाकू सापडले. राखीला अटक केल्यानंतर तीने चौकशीत पिस्तूल किशोर जाधव या इसमाने दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ अंबड गाठत रविवारी रात्री किशोर जाधव याला अटक केली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*