छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी झाल्याने, वैजापूर वगळता उर्वरित आठ मतदारसंघांत मतदान प्रक्रियेसाठी प्रत्येकी दोन ईव्हीएम मशीनचा वापर करावा लागणार आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर अतिरिक्त ताण आला असून, कन्नड मतदारसंघात तर केवळ ‘नोटा’साठी दुसऱ्या ईव्हीएम मशीनचा वापर करावा लागत आहे.
सोमवारी दुपारी ३ वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत संपल्यानंतर जिल्ह्यातील २१४ उमेदवारांनी माघार घेतली असली, तरी १८३ उमेदवार अद्याप रिंगणात आहेत. एका ईव्हीएम मशीनवर १६ उमेदवारांची नावे बसवता येतात, तर ‘नोटा’साठी अतिरिक्त स्लॉटची गरज आहे. त्यामुळे केवळ वैजापूरमध्ये एकाच ईव्हीएम मशीनवर मतदान होऊ शकणार असून इतर ठिकाणी दोन ईव्हीएम मशीन वापरणे गरजेचे ठरले आहे.
सात हजार मशीन सज्ज
मतदान केंद्रांवर पुरेशा ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट्स उपलब्ध आहेत. जिल्ह्यात एकूण ७१९० बॅलेट युनीट, ३९२६ कंट्रोल युनीट आणि ४२५० व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांतील एकूण ३२७३ मतदान केंद्रांवर यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी दिली.
निवडणुकीच्या वेळी प्रत्येक मतदान केंद्रावर एक कंट्रोल युनीट, दोन बॅलेट युनीट आणि एक व्हीव्हीपॅट मशीन आवश्यक असल्याने मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*