नवीन महिना म्हणजेच एप्रिल आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे बदल घेऊन आला आहे. आर्थिक सुधारणा, करप्रणालीतील बदल, वाहनांच्या किमती, बँकिंग नियम आणि अनेक इतर गोष्टींमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.

१. व्यावसायिक सिलिंडर स्वस्त, घरगुती गॅसच्या किमतीत बदल नाही:

१ एप्रिलपासून १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. दिल्लीत त्याची किंमत ₹४१ ने कमी होऊन ₹१७६२ झाली आहे. यापूर्वी ती किंमत ₹१८०३ होती. कोलकातामध्ये सिलिंडरची किंमत ₹१८६८.५० झाली असून, ही किंमत ₹४४.५० रुपयांनी कमी झाली आहे. मुंबईत सिलिंडरच्या किमतीत ₹४२ ची कपात झाली असून, तो आता ₹१७१३.५० मध्ये मिळेल. चेन्नईत याची किंमत ₹१९२१.५० आहे. मात्र, घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत तो ₹८०३ आणि मुंबईत ₹८०२.५० रुपयांना उपलब्ध आहे.

२. नवीन कर प्रणालीमध्ये १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त:

नवीन कर प्रणाली अंतर्गत आता १२ लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त राहणार आहे. पगारदारांसाठी ही मर्यादा १२.७५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यामध्ये ७५,००० रुपयांची मानक वजावट समाविष्ट आहे. मात्र, जुन्या कर प्रणालीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

३. ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ योजना बंद:

महिलांसाठी विशेष असलेल्या ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ (MSSC) योजनेचा कालावधी ३१ मार्च २०२५ रोजी संपला आहे. ही योजना महिलांना ७.५% वार्षिक व्याज देत होती. या अंतर्गत किमान १००० रुपये आणि जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येत होती.

४. वाहनांच्या किमती वाढल्या:

मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, किआ इंडिया, ह्युंदाई इंडिया आणि होंडा या कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. मारुती सुझुकीच्या कार्स ४% पर्यंत महाग झाल्या आहेत, तर टाटा मोटर्सच्या काही मॉडेल्सच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.

५. निष्क्रिय मोबाईल नंबरवर UPI सेवा बंद:

जर तुम्ही बँकेशी जोडलेला मोबाईल नंबर बराच काळ वापरलेला नसेल, तर त्यावरून UPI व्यवहार करता येणार नाही. राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने निष्क्रिय क्रमांक UPI प्रणालीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

६. ज्येष्ठ नागरिकांना व्याज उत्पन्नावर दुप्पट सूट:

बँका आणि पोस्ट ऑफिसमधून मिळणाऱ्या व्याज उत्पन्नावर ज्येष्ठ नागरिकांना आता १ लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळणार आहे. यापूर्वी ही मर्यादा ५०,००० रुपये होती.

७. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन योजना:

राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) अंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन योजना (UPS) लागू करण्यात आली आहे. ही योजना किमान २५ वर्षे सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना सरासरी मूळ वेतनाच्या ५०% इतकी पेन्शन प्रदान करेल.

८. युलिपवरील भांडवली नफा कर:

युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (युलिप) च्या वार्षिक प्रीमियमवर कर आकारणी करण्यात येणार आहे. जर प्रीमियम २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक असेल, तर त्यावर भांडवली नफा कर आकारला जाईल.

९. बँकेतील किमान शिल्लक नियम बदलले:

एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक आणि इतर काही बँकांनी किमान शिल्लक नियम बदलले आहेत. खाते शहरी, अर्ध-शहरी किंवा ग्रामीण भागात असल्यावर या किमान शिल्लक रकमेत बदल होणार आहे.

१०. विमान प्रवास होऊ शकतो स्वस्त:

एव्हिएशन टर्बाइन इंधनाच्या (ATF) किमतीत ६,०६४.१० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे विमान प्रवास स्वस्त होण्याची शक्यता आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल नाही:

आज १ एप्रिल रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सध्या दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ८७.६२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल १०३.४४ रुपये आणि डिझेल ८९.९७ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.

एप्रिल महिन्यात लागू झालेल्या या बदलांचा सर्वसामान्य नागरिकांवर मोठा परिणाम होणार आहे. नवीन करसवलती, गॅस सिलिंडरच्या किमतीतील बदल, वाहनांच्या दरवाढीमुळे आर्थिक गणिते बदलणार आहेत. या महत्त्वाच्या बदलांची माहिती ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,907 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क