छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात मुला-मुलींच्या असमान प्रमाणामुळे चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुलींच्या जन्मदर वाढविण्यासाठी आणि पीसीपीएनडीटी कायद्याचा व्यापक प्रसार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मराठी नववर्षारंभ दिनानिमित्त बुधवारी (दि.२) प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर कन्या दिन साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जाणार आहे. बेटी बचाओ अभियानाला गती देण्यासाठी आणि मुलींच्या जन्माचे महत्त्व समाजात रुजवण्यासाठी या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी (दि.१) तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच ३०, ३१ मार्च आणि १ एप्रिल रोजी गावोगावी कार्यक्रमाची पूर्वतयारी केली जाईल.
कार्यक्रमांतर्गत महिला आणि बालिकांच्या प्रगतीवर व्याख्याने, मार्गदर्शन सत्रे, सांस्कृतिक स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि महिला आरोग्यावर चर्चा यांसारखे उपक्रम राबवले जातील. विशेषतः मुलींच्या शिक्षणास चालना देणाऱ्या आणि समाजात योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येईल.
कार्यक्रम आयोजनाचे उद्दिष्टे
•पीसीपीएनडीटी कायद्याची जनजागृती
•मुलगी जन्माला यावी यासाठी समाजप्रबोधन
•लिंगनिदान चाचण्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी जनजागृती
•ग्रामपंचायत स्तरावर बेटी बचाओ चळवळीला चालना
•महिला आणि मुलींच्या सन्मानासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन
या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक बदल घडवण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*