छत्रपती संभाजीनगर : दोन चुलत भावांच्या संसारातील विसंवाद, दारूचं व्यसन, आणि वडिलांचा संताप या साऱ्यांचा फटका त्यांच्या कोवळ्या लेकरांना बसला. केवळ थोड्याशा रागाच्या क्षणी पाच निष्पाप अपत्यं घराबाहेर निघून गेली होती. या घटनेनं शहरात खळबळ उडवली होती. त्यातील दोन मुलं याआधीच सापडली होती, तर उर्वरित तिघं – दोन मुली आणि एक मुलगा – हे आज (दि. ५) सकाळी जालना येथे सुखरूप सापडले.
ही पाचही मुले ११ ते १६ वयोगटातील आहेत. दोघे चुलत भाऊ – एक रिक्षाचालक आणि दुसरे मोलमजुरी करणारे – या दोघांचाही संसार मोडला आहे. त्यांच्या पत्नी वेगळ्या राहतात, पण मुलं वडिलांसोबत राहत होती. दोघांनाही दारूचं अतिव्यसन असून, वडिलांचा राग, कठोर वागणूक यामुळे मुलं मानसिकदृष्ट्या त्रस्त होती.
बुधवारी (दि. २) सकाळी मुलं घरी होती. मात्र, सायंकाळी परतल्यानंतर वडिलांना ती घरात दिसली नाहीत. नातेवाइकांकडे शोध घेतल्यावर लक्षात आलं की चुलत भावाच्या घरीही दोन अपत्यं दिसेनात. तात्काळ हसूल पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान पहिल्या दोन अपत्यांचा शोध पारध शिवारात लागला. त्यांनी पहिली रात्र हसूल परिसरात आणि दुसरी रेल्वे स्टेशनवर काढल्याचं निष्पन्न झालं. उर्वरित तिघांबाबत पोलिसांनी तपास सुरूच ठेवला आणि अखेर आज सकाळी ती तिघंही जालना येथे एका नातेवाइकांकडे असल्याचं आढळून आलं.
पोलीस उपनिरीक्षक राहुल निर्वळ आणि गणेश केदार यांनी केलेल्या सतर्क तपासामुळे ही मुले सुखरूप मिळून आली आहेत. मात्र, या घटनेनं पालकत्व, जबाबदारी आणि मुलांच्या भावनिक गरजांबाबत समाजाला गंभीर विचार करायला लावलं आहे.
ही मुलं फक्त घरातून निघून गेलेली नाहीत, तर त्यांनी मायेचा आणि सुरक्षिततेचा शोध सुरू केला होता. त्यांना जे हवं होतं ते एक हक्काचं हास्य, एक प्रेमळ शब्द, आणि समजून घेणारी छाया होती… जे त्यांच्या घरात दारूच्या वासात हरवलं होतं.
ही घटना केवळ पोलिसांची कामगिरी नव्हे, तर एका कुटुंबाचं होत्याचं नव्हतं होण्यापासून वाचवलेली आहे. समाज म्हणून आपण याकडून शिकणं गरजेचं आहे – कारण कोवळ्या वयातले अश्रू फार वेळा मनात खोल घर करून जातात.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*