छत्रपती संभाजीनगर : शहरातील विविध रुग्णालयांच्या परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या सिरीयल चोरट्याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल २६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या वाहनांची एकूण किंमत सुमारे २३ लाख ४० हजार रुपये इतकी आहे.
एकनाथ महादु मुंडे (वय २७, रा. शेवडी, ता. जिंतूर, जि. परभणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी शहरातील रुग्णालये, गर्दीची ठिकाणे आणि निर्जन भागांमध्ये पार्क केलेल्या दुचाकींवर लक्ष ठेवून चोरी करत होता. त्यानंतर त्या दुचाकी परभणी जिल्ह्यातील जिंतूर एमआयडीसी परिसरात विक्रीसाठी ठेवत होता.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जिंतूर बस स्थानकाजवळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने शहरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या सांगण्यावरून जिंतूर एमआयडीसी येथून होंडा शाईन, हिरो एचएफ डिलक्स, स्प्लेंडर प्लस, ड्रीम युगा, युनिकॉर्न आणि सुपर स्प्लेंडर अशा प्रकारच्या एकूण २६ दुचाकी जप्त केल्या.
या दुचाकींचे इंजिन व चेसिस नंबर तपासून त्या चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाले असून, या कारवाईत शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिसांकडून आरोपीचा पुढील तपास सुरू असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*