छत्रपती संभाजीनगर : शहरातील वेदांतनगर, उस्मानपुरा, पन्नालालनगर परिसरात गेल्या १५ दिवसांपासून मुली व महिलांची दुचाकीवरून पाठलाग करत अश्लील छेडछाड करणाऱ्या एका विकृत तरुणाला पोलिसांनी केवळ पाच तासांत अटक केली. गजानन दत्तराव गडदे (वय २२, रा. हट्टा पाटील, ता. शेणगाव, जि. हिंगोली, सध्या रा. कैलासनगर, अशोक चौक) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
शहरातील वेदांतनगर, उस्मानपुरा परिसरात अनेक मुली हॉस्टेल्समध्ये राहून शिक्षण घेत आहेत. संध्याकाळी अंधार पडल्यानंतर कमी वर्दळीच्या रस्त्यांवर या विकृताचे हालचाल वाढत होती. तो रोज नवनवीन कपडे घालून दुचाकीवर फिरायचा आणि रस्त्यावरून पायी जाणाऱ्या तरुणींना आक्षेपार्हरीत्या स्पर्श करून पसार व्हायचा.
बुधवारी सायंकाळी ७.३० वाजता पन्नालालनगर परिसरात एका १८ वर्षीय विद्यार्थिनीसोबत घडलेली घटना हा प्रकार उघडकीस आणणारी ठरली. आरोपीने दुचाकीवरून येत तिच्या खांद्याला धक्का दिला आणि अश्लील स्पर्श करून सुसाट पळ काढला. त्यानंतर तासाभराने बन्सीलालनगर परिसरात आणखी एका महिलेसोबत अशाच प्रकारची छेडछाड करण्यात आली.
सदर प्रकारामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण पसरले होते. काही मुलींनी आरोपीचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला, मात्र तो हाती लागला नव्हता. एका प्रकरणात पीडितेच्या खांद्यावर नखेही ओरबाडली गेल्याची माहिती समोर आली होती.
या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि प्रवीणा यादव, PSI मोरे, पोलीस हवालदार सुलाने व डोईफोडे यांच्या पथकाने आरोपीचा कसोशीने शोध घेतला. रात्रीच्या सुमारास आरोपीला अटक करण्यात आली असून, आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
शहरात अशा विकृत प्रकारांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी तत्परता दाखवून आरोपीस अटक केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*