छत्रपती संभाजीनगर : शहरातील सेव्हन हिल परिसरात बी. टेकचा शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्यावर तीन अनोळखी इसमांनी हल्ला करून मोबाईल, रोख रक्कम आणि UPI द्वारे खाते रिकामे केल्याची घटना घडली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस उपनिरीक्षक कर्हाळे तपास करत आहेत.
१७ वर्षीय विद्यार्थी एमजीएम कॉलेजमध्ये बी. टेक, आय.टी.च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. तो लकी ज्यूस सेंटरजवळ भाड्याने राहत असून मूळ गाव लातूर जिल्ह्यातील औसा येथे आहे. त्याचे आईवडील सध्या औसा येथे वास्तव्यास आहेत.
२ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता त्याच्या आईवडिलांनी हमसफर ट्रॅव्हल्समार्फत त्याला जेवणाचा डब्बा पाठवला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता डब्बा घेण्यासाठी तो सेव्हन हिल येथील इगल्स कॉम्प्युटर दुकानासमोर थांबलेला असताना, तीन अनोळखी इसम मोटारसायकलवर येऊन थांबले.
त्यांनी त्याच्यावर हल्ला करून मोबाईल व खिशातील ५०० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने घेतली. तसेच मोबाईलचा पासवर्ड विचारून गुगल पे उघडले व त्याच्या खात्यातून UPI द्वारे १३७०० रुपये काढून आरोपी मोबाईल घेऊन पसार झाले.
या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थ्याने एका रिक्षाचालकाच्या मदतीने वडिलांशी संपर्क साधून नंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात तीन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*