harsul-encroachers-rent-relief-scheme
छत्रपती संभाजीनगर : हर्सूल येथील गट क्र. २१६ व २१७ मध्ये पीएम आवास योजनेंतर्गत ७०० घरे उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी महापालिकेने अतिक्रमित भागातील झोपड्या हटविल्यानंतर, बेघर झालेल्या १८० अतिक्रमणधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिऱ्हाड मांडून आंदोलन सुरू केले होते.
याची दखल घेत मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी महत्त्वाचा निर्णय घेत, अतिक्रमणधारकांना पुढील १८ महिन्यांसाठी दरमहा प्रत्येकी दोन हजार रुपये घरभाडे देण्याचे जाहीर केले. त्यामुळे या कुटुंबांना दरमहा सुमारे ३ लाख ६० हजार रुपये, तर एकूण १८ महिन्यांसाठी ६४ लाख ८० हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत. मनपाच्या इतिहासातील हा पहिलाच निर्णय असून, यापूर्वी अतिक्रमणधारकांना जमीन दिली गेली होती, मात्र कधीच घरभाडे देण्यात आले नव्हते.
प्रशासक श्रीकांत यांनी सांगितले की, हर्सूल गृहप्रकल्पासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाने महापालिकेला जागा दिली होती. मात्र, त्या जागेवर अतिक्रमण असल्याचे नंतर लक्षात आले. या नागरिकांना पीएम आवास योजनेंतर्गत प्राधान्याने घरे देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्यांनी ऐकले नाही, म्हणून झोपड्या हटविण्यात आल्या.
सदर गृहप्रकल्पासाठी कंत्राटदाराला १८ महिन्यांची मुदत दिली असून, ७०० घरांच्या बांधकामात अतिक्रमणधारकांसाठी ५ टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. मात्र हा निर्णय केवळ हर्सूल भागापुरता मर्यादित असेल, अन्य ठिकाणी लागू होणार नाही, असे प्रशासकांनी स्पष्ट केले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*