प्रयागराज येथे २०२५ साली होणारा महाकुंभ मेळावा १४ जानेवारीला मकर संक्रांतीपासून सुरू होणार असून, २५ फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी समाप्त होईल. या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्याला देश-विदेशातून सुमारे २५ कोटी श्रद्धाळू, साधू-संत, आणि विविध मठांचे प्रमुख उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
या महाकुंभ मेळाव्यासाठी केंद्र सरकारने २१०० कोटी रुपये आणि उत्तर प्रदेश सरकारने १४०० कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन केले आहे. हिंदू धर्माचे संरक्षण, संवर्धन आणि प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रविणभाई तोगडिया यांनी देशभरातील १ कोटी भाविकांच्या सेवेसाठी विशेष व्यवस्था करण्याचा संकल्प केला आहे.
भाविकांसाठी मोफत भोजन, राहण्याची व्यवस्था आणि इतर सुविधा पुरविण्यात येणार असून, यासाठी लागणारा ५० कोटी रुपयांचा निधी लोकसहभागातून उभारला जाईल. प्रत्येक भाविकासाठी फक्त ५० रुपये खर्च अपेक्षित आहे.
डॉ. तोगडिया यांनी सांगितले की, “महाकुंभ मेळावा केवळ धार्मिक उत्सव नसून हिंदू संस्कृतीचा जागतिक परिचय करून देणारा पर्व आहे. देशभरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याचा भाग व्हावे.”
या पत्रकार परिषदेत हिंदू हेल्पलाईनचे राष्ट्रीय महामंत्री श्री. हेमंत त्रिवेदी, देवगिरी प्रांताचे अध्यक्ष डॉ. जे.के. जाधव आणि राष्ट्रीय बजरंग दलाचे अध्यक्ष श्री. सुभाष मोकरिया हे उपस्थित होते.
महाकुंभ मेळाव्याच्या तयारीला सुरुवात झाली असून, भाविकांना सोयीसुविधा देण्यासाठी विविध संस्थांमार्फत कार्य केले जात आहे. देशातील सर्व नागरिकांनी या पवित्र सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*