छत्रपती संभाजीनगर : शहरात नायलॉन मांजाचा धोकादायक प्रभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. शनिवारी (२१ डिसेंबर) सकाळी शहानूरमियाँ दर्गाजवळ कामावर निघालेल्या पांडुरंग पाटकुले (वय ३०) या तरुणाच्या गळ्याला नायलॉन मांजामुळे १० सेंमीपर्यंत चिर पडली. सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून गळ्याला १६ टाके घालण्यात आले आहेत.
कैलासनगर येथील पांडुरंग पाटकुले हे त्रिमूर्ती चौकात कामासाठी जात असताना अचानक त्यांच्या गळ्यात मांजा अडकला. या घटनेत गळा चिरल्यामुळे रक्तस्राव झाला. प्रसंगावधान राखत त्यांनी स्वतःला सावरले आणि एका हाताने जखम दाबून हेडगेवार रुग्णालयात पोहोचले. मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.
मकरसंक्रांती जवळ आल्याने पतंगबाजी वाढत आहे. मात्र, नायलॉन मांजामुळे पक्ष्यांसोबत नागरिकांचे प्राणही धोक्यात आले आहेत. या घातक मांजावर बंदी असली तरी त्याची सर्रास विक्री सुरू आहे.
पोलीस आयुक्तांचा इशारा:
पतंग विक्रेत्यांना इशारा देत पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितले की, नायलॉन मांजा विक्री करताना आढळल्यास थेट गुन्हा दाखल होईल आणि अटक केली जाईल. विक्रेत्यांची दुकानं आणि गोडाऊनवर सातत्याने तपासणी केली जाणार आहे.
प्रशासनावर टीका:
घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देताना भाजप पदाधिकारी निखिल महाले म्हणाले, “प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज माझ्या भावाच्या जिवावर बेतले. उद्या कोणाच्याही जिवाला धोका होऊ शकतो. प्रशासनाने कारवाई केली नाही, तर आम्ही आंदोलन करू.”
डॉ. सुरेश हरबडे यांनी नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी हेल्मेट, मानेचे बेल्ट आणि जाड कपडे वापरण्याची सूचना केली, ज्यामुळे मांजापासून बचाव करता येईल.
शहरवासीयांनी नायलॉन मांजावर त्वरित कठोर बंदी घालण्याची मागणी केली असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हउपस्थित केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*