छत्रपती संभाजीनगर : मागील 38 वर्षांपासून वन्यजीव छायाचित्रण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रसिद्ध वाइल्डलाइफ फोटोग्राफर बैजू पाटील यांनी महाराष्ट्रासह भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. इंडोनेशियाच्या “क्रोमॅटीक फोटोग्राफी 2024” स्पर्धेत त्यांना Through the Legs या त्यांच्या उत्कृष्ट छायाचित्रासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे.
31 देश, 65 हजार फोटो, अव्वल बैजू पाटील
या स्पर्धेत 31 देशांतील 65,000 छायाचित्रे सादर करण्यात आली होती. बैजू पाटील यांनी जीम कार्बेट राष्ट्रीय उद्यानात टिपलेल्या हत्तींच्या कळपाच्या छायाचित्राने जगभरातील निर्णायकांना मोहवून टाकले. त्यांच्या कलात्मक आणि धाडसी फोटोग्राफीने परदेशी छायाचित्रकारांच्या मक्तेदारीला कणखर उत्तर दिले आहे.
असा आहे पुरस्कार प्राप्त फोटो
जीम कार्बेट राष्ट्रीय उद्यानात भ्रमंती करताना बैजू पाटील यांना हत्तींचा कळप दिसला. त्यावेळी एका मोठ्या हत्तीच्या पायांमधून समोरील कळपाची फ्रेम त्यांनी टिपली. या छायाचित्रासाठी अत्यंत छोट्या लेन्सचा वापर केला गेला असून, हत्तींच्या अत्यंत जवळ जाऊन ही फ्रेम कैद करण्यात आली आहे.
हत्तींच्या फोटोग्राफीसाठी जबरदस्त मेहनत आणि धैर्याची आवश्यकता असते, कारण हत्ती कुठल्याही क्षणी आक्रमक होऊ शकतात. विशेषतः बैजू पाटील यांच्यावर तीन-चार वर्षांपूर्वी हत्तीने हल्ला केला होता, परंतु या अनुभवातूनही त्यांनी धीर सोडला नाही आणि अखेर हा कलात्मक फोटो साकारला.
हत्तींच्या हिवाळी सैराटीची टिपलेली फ्रेम
जीम कार्बेटमध्ये मे-जूनच्या काळात रामगंगा नदी आटल्यावर हिरव्या गवताच्या चाऱ्यासाठी हत्तींचा मोठा कळप जमा होतो. बैजू पाटील यांनी या अनोख्या दृश्याचे बारकाईने निरीक्षण करून “Through the Legs” या छायाचित्राची निर्मिती केली.
40 पेक्षा जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार
बैजू पाटील यांना आतापर्यंत 40 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या कामगिरीने भारताचे नाव जागतिक पटलावर उंचावले आहे. भारतातील समृद्ध परंतु लाजाळू वन्यजीवांचे छायाचित्रण करणे ही मोठी आव्हानात्मक गोष्ट आहे. त्यांच्यातील समर्पण आणि कौशल्यामुळेच ते जागतिक स्तरावर चमकले आहेत.
एमजीएम विद्यापीठाचे फोटोग्राफी विभाग प्रमुख
बैजू पाटील हे एमजीएम विद्यापीठातील फोटोग्राफी विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी आजवर अनेक प्रतिभावान छायाचित्रकार घडवले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर झळकण्याची संधी मिळाली आहे.
जागतिक स्तरावर भारताचा दबदबा
चार ते पाच वर्षे परिश्रम घेतल्यानंतर यंदा बैजू पाटील यांना जागतिक स्तरावरील हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला. या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांनी भारताच्या वन्यजीव छायाचित्रणाची ताकद जगासमोर सप्रमाण सिद्ध केली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*