छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत शहरातील नागरिकांसाठी ११ हजार घरे बांधण्यात येणार असून, यासाठी तब्बल ४० हजार अर्ज महापालिकेकडे दाखल झाले आहेत. पात्र लाभार्थ्यांना घरे देण्यासाठी ड्रॉ पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे.
चार ठिकाणी घरकुल योजना
पडेगाव, हर्मूल, सुंदरवाडी आणि तिसगाव या चार ठिकाणी ११ हजार घरे बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र, अर्जदारांची संख्या अधिक असल्याने वाटप प्रक्रियेत गोंधळ होण्याची शक्यता आहे. पात्र अर्जदारांना महापालिकेकडून एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल. त्यानंतर लाभार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातून पसंतीक्रम नमूद करावा लागेल.
ऑनलाइन व ऑफलाइन सुविधा उपलब्ध
ज्या लाभार्थ्यांना ऑनलाइन पसंतीक्रम देता येणार नाही, त्यांच्यासाठी झोन कार्यालयांमध्ये खास कर्मचारी नियुक्त केले जातील. याशिवाय, या संपूर्ण प्रक्रियेसाठी महापालिकेने खासगी एजन्सी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, एजन्सी निवड प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही.
निकषांनुसार निवड प्रक्रिया
योजनेत एकल महिला, विधवा, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर निकषांनुसार लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. ज्या ठिकाणी सर्वाधिक अर्ज असतील, त्या ठिकाणी ड्रॉ काढून घरे वाटली जातील, अशी माहिती प्रकल्प प्रमुख अपर्णा थेटे यांनी दिली.
फेरनिविदा प्रक्रिया सुरू
महापालिकेने या योजनेसाठी खासगी एजन्सी निवडण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती. मात्र, एका एजन्सीनेच निविदा भरल्याने फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*