छत्रपती संभाजीनगर: शहरातील गजबजलेल्या सिटी चौक भागात भरदिवसा एका तरुणाचे अपहरण करण्यात आले. अवघ्या १५ सेकंदांत झालेल्या या थरारक घटनेने परिसरात खळबळ माजली. मात्र, अपहरणकर्त्यांपैकी एकाचा मोबाईल घटनास्थळी पडल्यामुळे पोलिसांना कारवाई सोपी झाली आणि काही तासांत तरुणाची सुटका करण्यात यश आले.
काय घडले?
पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील एका तरुणाने छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या परिचयातील व्यक्तीकडून सोन्याचे दागिने खरेदीसाठी आठ लाख रुपये दिले होते. मात्र, पैसे दिल्यानंतरही संबंधित व्यक्तीकडून दागिने मिळाले नाहीत. या रकमेवरून गेल्या सहा महिन्यांपासून वाद सुरू होता. वारंवार पैसे मागूनही ते परत न दिल्याने संभाजीनगरमधील व्यक्तीने आपले काही साथीदारांसोबत मिळून अपहरणाचा कट रचला.
रेकी करून अपहरण
अपहरणकर्त्यांनी आधी सिटी चौक परिसरातील मीना फंक्शन हॉलच्या मागील गल्लीत ३० मिनिटे रेकी केली. नंतर, अवघ्या १५ सेकंदांत तरुणाला जबरदस्तीने कारमध्ये कोंबून पळवून नेण्यात आले.
पोलिसांची वेगवान कारवाई
घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपहरणकर्त्यांपैकी एका व्यक्तीचा मोबाईल घटनास्थळी पडला होता. या मोबाईलवर अपहरणकरत्याचा कॉल आला अन् पोलिसांनी तात्काळ मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी तरुणाची सुटका केली आणि दोन आरोपींना ताब्यात घेतले.
या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून घटनेमुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे. भरदिवसाच्या या धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*