छत्रपती संभाजीनगर: ग्रामीण हद्दीतून वाळू वाहतूक करण्यासाठी २० हजार रुपये महिना लाच मागणाऱ्या पोलिस अंमलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. अंमलदार धीरज धर्मराज जाधव (५०, रा. रविनगर, हडको) याला सोमवारी रात्री ११.३० वाजता गाडेगाव फाट्याजवळ अटक करण्यात आली.
तक्रारदार व्यावसायिक वाळू व्यवसायात कार्यरत असून ग्रामीण हद्दीतून वाहतूक करण्यासाठी जाधवने दरमहा २० हजार रुपये हप्ता मागितला होता. तक्रारदाराने थेट एसीबीच्या अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीच्या चौकशीत जाधव लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले.
सापळा कसा रचला?
एसीबीच्या पथकाने सोमवारी रात्री गाडेगाव फाट्याजवळ सापळा रचला. तक्रारदाराच्या हेडलँप सुरू असलेल्या कारच्या उजेडात जाधवने २० हजार रुपये स्वीकारले. तक्रारदाराने ठरल्याप्रमाणे खांद्यावर रुमाल ठेवताच पथकाने कारवाई करत जाधवला ताब्यात घेतले.
जाधवविरोधात बीडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. लाच मागितल्यास त्वरित एसीबीशी संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*