छत्रपती संभाजीनगर: एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने महादेव मंदिर आणि शनिमंदिरातील चोरी प्रकरणाचा उलगडा करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत 2.17 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी वाळूज एमआयडीसीतील रामनगर रांजनगाव येथील महादेव मंदिरातील पिंडीवरील पितळी नाग चोरीला गेल्याची तक्रार राम मंदिर समितीचे अध्यक्ष गंगाराम हिवाळे यांनी दिली होती. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दिनांक 9 जानेवारी रोजी सायंकाळी एका व्यक्तीने मंदिरात प्रवेश करून चोरी केल्याचे समोर आले.
गुन्ह्याचा उलगडा आणि आरोपीची कबुली
तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे चंद्रकांत तुकाराम सातपुते (वय 21) या आरोपीला 21 जानेवारी रोजी अटक केली. आरोपीने राम मंदिरातील चोरीसह शनिमंदिरात पितळी वस्तू चोरी केल्याची कबुली दिली.
पोलीस तपासादरम्यान पितळी नाग, नंदीच्या गळ्यातील पितळी घंटा, पितळी दिवा, तांब्याचे नागफणी आणि चोरीसाठी वापरलेली बुलेट मोटारसायकल असा एकूण 2.17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीचा माल खरेदी करणाऱ्या दोन इसमांनाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.
पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी
पोलीस आयुक्त प्रविण पवार, उप आयुक्त नितीन बगाटे, सहाय्यक आयुक्त महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
सदर प्रकरणातील तपास सुरू असून, इतर मंदिर चोऱ्याही उघड होण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*