छत्रपती संभाजीनगर: लोखंडी पाईप आणि गाडी चोरून विक्री करण्यासाठी ट्रक चालकाचा खून करून मृतदेह गाडीच्या केबिनमध्ये लपवणाऱ्या तिघा आरोपींना चिकलठाणा पोलिसांनी 24 तासांत अटक केली आहे.
दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी चिकलठाणा हद्दीत आडगाव शिवाराजवळ सोलापूर-धुळे महामार्गावर विजय मुरलीधर राऊत (वय 52, रा. केडगाव, जि. अहिल्यानगर) यांचा मृतदेह गाडीच्या केबिनमध्ये सापडला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींना गजाआड केले.
लिफ्टच्या बहाण्याने केला खून
मयत विजय राऊत रायपूर येथून माल घेऊन जात असताना आरोपी गणेश वसंत पवार (वय 37, रा. सुलतानपूर, जि. बुलढाणा) याने त्यांना लिफ्ट मागितली. गाडी सुरू झाल्यानंतर गणेश पवारने टॉमीच्या साहाय्याने विजय राऊत यांचा खून केला आणि मृतदेह गाडीच्या केबिनमध्ये ठेवला.
माल विकून आरोपींनी घेतला पळ
खुनानंतर गणेश पवारने आपल्या साथीदारांना – गणेश गजानन कुटे (वय 29) आणि ज्ञानेश्वर गणेश घायाळ (वय 27) यांना बोलावले. या तिघांनी लोणार येथे गाडीतील तीन टन लोखंडी पाईप विकले. माल विकल्यानंतर त्यांनी चिकलठाणा हद्दीत आडगाव शिवाराजवळ ट्रक सोडून पळ काढला.
गुप्त माहितीच्या आधारे अटक
स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे बुलढाणा जिल्ह्यातून आरोपींना शिताफीने अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरीचा माल विक्रीसाठी वापरलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश वाघ व त्यांच्या टीमने ही धडाकेबाज कारवाई केली. आरोपींना पुढील तपासासाठी चिकलठाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्ह्याचा उद्देश व तपासाच्या वेगवान कारवाईने पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*