मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुती सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे तब्येतीच्या कारणास्तव प्रत्यक्ष उपस्थित नसले तरी त्यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला. या बैठकीत एकूण 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
प्रमुख निर्णयांमध्ये काटोल आणि आर्वी येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय, पैठण आणि गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय उभारणीचा समावेश आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान देण्याचे निर्णय घेतले गेले. तसेच अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील 36 हजाराहून अधिक केंद्रे प्रकाशमान होणार आहेत.
तसेच, पुणे-छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा, अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणे, शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीसाठी अर्थसहाय्य, हिंगोलीसाठी स्वतंत्र न्यायिक जिल्हा यांसारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “लाडकी बहिणी” योजनेमुळे इतर कोणत्याही योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, राज्यातील शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात यावर्षी 121 टक्के पेरण्या झाल्या असून, 2018 नंतर प्रथमच मोठी धरणे शंभर टक्के भरली गेली आहेत.
शिवाय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे 1 कोटी 60 लाख भगिनींना 4787 कोटींचे वाटप करण्यात येणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*