छत्रपती संभाजीनगर येथील खाम नदीच्या पुनरुज्जीवनासाठी महापालिकेच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट रॉस सेंटर प्राइज फॉर सिटीज या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी या प्रकल्पाची निवड झाली आहे. २५ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क येथे झालेल्या सोहळ्यात २५ हजार डॉलर्सचे बक्षीस प्रदान करण्यात आले.
खाम नदी पुनरुज्जीवन हा प्रकल्प २०२१ पासून महापालिका, छावणी परिषद, व्हेरॉक कंपनी आणि इकोसत्व यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत खाम नदीपात्रातून शेकडो ट्रक कचरा हटवून नदीचे स्वच्छ व निरोगी रूप पुन्हा प्राप्त करण्यात आले. बंधाऱ्यांच्या बांधणीमुळे नदीचे जलस्रोत समृद्ध झाले असून, नदीत पक्षी आणि प्राण्यांचा वावर वाढला आहे.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या पुढाकाराने सुरू झालेला हा प्रकल्प आता जागतिक स्तरावर चर्चेत आला आहे. ‘हवामानासाठी सज्ज समुदायांना गती देणे’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या पुरस्कारात ६२ देशांतील १४८ शहरांमधील २०० प्रकल्पांचा समावेश होता. त्यामधून खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाने पहिल्या पाच प्रकल्पांमध्ये स्थान मिळविले.
न्यूयॉर्कमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात इकोसत्वच्या संस्थापक नताशा जरीन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. छत्रपती संभाजीनगर, न्यूयॉर्क, ब्राझील, अर्जेंटिना आणि नॉर्वे या देशांच्या प्रकल्पांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना, “हा पुरस्कार छत्रपती संभाजीनगरसाठी एक मोठा गौरव आहे,” असे सांगितले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*