मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बीड जिल्ह्यातील नारायणगडावर भव्य दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, मराठा समाजाचे हजारो बांधव मोठ्या संख्येने या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत.
या मेळाव्यात छत्रपती संभाजीनगरहून आणि इतर भागांतून येणाऱ्या मराठा बांधवांसाठी खास सवलत देण्यात आली आहे. धुळे-सोलापूर महामार्गावर पाचोड टोलनाक्यावरून जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी दिली जाणार आहे. सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी टोल व्यवस्थापनाशी चर्चा करून गडावर जाणाऱ्या वाहनांना मोफत सोडण्याची विनंती केली होती.
सुरेश वाकडे यांनी सांगितले की, संभाजीनगर आणि जिल्ह्याच्या विविध भागांतून सुमारे तीन हजार वाहनांची गर्दी होईल. पाचोड आणि आसपासच्या परिसरातील वाहनांची संख्याही लक्षणीय आहे. टोलनाका व्यवस्थापनाने वाहनांना भगवा झेंडा आणि नारायणगड दसरा मेळाव्याचे स्टिकर लावण्याच्या अटीवर मोफत सोडण्याचे मान्य केले आहे.
मराठा समाजाच्या या मेळाव्यामुळे आरक्षणाच्या लढ्याला अधिक जोम मिळण्याची शक्यता आहे. नारायणगडावर या उत्सवाची तयारी जोरात असून, मराठा समाजाचा या आंदोलनातील सहभाग अधिक दृढ होईल, असा अंदाज आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*