अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्यावर बुधवारी रात्री वांद्रे परिसरातील खेरवाडी जंक्शनजवळ गोळीबार झाला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, अजून एका हल्लेखोराचा शोध सुरू आहे.
बाबा सिद्दिकी हे त्यांच्या मुलगा झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना, अचानक तिघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर बंदुकीतून सहा राऊंड फायर केले. तीन गोळ्या त्यांच्या छातीत लागल्या, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. एक गोळी त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीच्या पायात लागली. या हल्ल्यामुळे वांद्रे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, घटनास्थळी पथदिवे बंद होते तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही नव्हते. पोलिसांना घटनास्थळी 9.9 एमएम डिटेचेबल मॅगझिनसह एक पिस्तुल आणि गोळीच्या पुंगळ्या सापडल्या आहेत, जे अत्याधुनिक असल्याचे सांगण्यात आले आहे.
या हल्ल्याच्या वेळी विजयादशमीच्या मिरवणुकीमुळे परिसरात फटाक्यांचा आणि वाद्यांचा आवाज होता. हल्लेखोरांनी याचाच फायदा घेतला आणि फायरिंग केली. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे, आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी उपस्थित आहेत.
सिद्दिकी यांच्या मृत्यूमुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस प्रशासन आता या हत्येच्या चौकशीवर लक्ष केंद्रित करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*